Pages

Friday, May 21, 2021

महाभारतातील निवडक श्लोक*--शत्रूसमोर अंधवत् व्हावे

 *🙏🏼🙏🏼🕉️शुभसकाळ🕉️🙏🏼🙏🏼*

    *महाभारतातील निवडक श्लोक*


*अन्धः स्यादन्धवेलायां बाधिर्यमपि चाश्रयेत्॥*

*कुर्यात्तृणमयं चापं शयीत मृगशायिकाम्।*

*सान्त्वादिभिरुपायैस्तु हन्याच्छत्रुं वशे स्थितं॥*

*दया न तस्मिन्कर्तव्या शरणागत इत्युत।*

*निरुद्विग्नो हि भवति न हताज्जायते भयम्॥*


            *- १.१५३.२२-२४, महाभारत.*


अर्थ :-


         (कणिक धृतराष्ट्र व दुर्योधनादिकांना म्हणतो,) प्रसंगी आपण आंधळे आहोत असेही दाखवावे, म्हणजेच जेव्हा आपण शत्रूसमोर असमर्थ असू त्या वेळी शत्रूचे दोष पाहू नये. आपण शत्रूसमोर कमजोर असू तेव्हा जर सगळीकडून आपली निंदा अथवा धिक्‍कार होत असेल तर त्यांस (ऐकूनही) न ऐकल्यासारखे करून बहिरे व्हावे.  

       अशा वेळी आपल्या धनुष्याला तृणासमान मानून  मृगाची शिकार करणार्‍या व्याधाप्रमाणे झोपेचे सोंग घ्यावे. म्हणजेच शत्रुच्या नजरेत आपण अगदी हीनदीन दुर्बळ आहोत असे दाखवावे; परंतु झोपलेला शिकारी जसे खोट्या झोपेचं सोंग घेऊन सावजाला आश्वस्त करतो की याच्या पासून आपल्याला धोका नाही. तेव्हा सावज व्याधाच्या आसपास निर्धास्त होऊन चरू लागते, त्यावेळी व्याध सावजाला बाणांनी घायाळ करतो. याचप्रमाणे शत्रुला संपवण्याची संधी शोधत आपला मूळ हेतू, मनोरथ लपवत दुर्बल असल्याचा दिखावा करावा. अशाप्रकारे सांत्वनादि (साम, दाम) उपायांनी कपटपूर्ण वागून वश झालेल्या शत्रूचा विश्वास उत्‍पन्न करून घात करावा.

      हा मला शरण आला आहे असे म्हणून त्याला ‍अभय देऊ नये, दया दाखवू नये. शत्रुला मारूनच राजा निर्भय होऊ शकतो. जर शत्रू मारला गेला नाही तर आपल्याला सदैव त्याचे भय राहाते.


टीप-

       ययाती, पुरू, दुष्यंत, भरत, कुरू, प्रतीप, शांतनू, भीष्म यांसारख्या महान राजर्षींच्या वंशातील धृतराष्ट्र, दुर्योधनादि कौरवांनी अशा प्रकारे कपटनीतीचा आश्रय घेणे हे त्यांच्या कुळाला लांच्छनास्पदच होय. म्हणूनच या सर्वांचा अंतही अतिशय दारूण असाच झाला.

          मात्र राजनीतीचा एक भाग म्हणून वापरली गेलेली ही कपटनीती मात्र नंतरच्या कलीयुगातील मानवी जीवनाचा भाग झालेली आहे धोका, दगाबाजी, विश्वासघात होणे याकाळात सर्वत्र पहायला मिळते. कणिकाचा उपदेश कलीयुगातील सर्व माणसांनी स्वीकारला पण श्रीकृष्णांचा उपदेश स्वीकारणारे कमीच आहेत. म्हणून श्रीकृष्णस्वारी श्रीमद्भगवद्गीतेमध्ये सांगतात की,

_बहूनां जन्मनामन्ते ज्ञानवान्मां प्रपद्यते।_

_वासुदेवः सर्वमिति स महात्मा सुदुर्लभः॥७.१९॥_

अनेक जन्मांच्य‍ा अखेरी ज्ञानवंत मला (अंतरातील परमात्म्याला) ओळखून शरण येतात, वासुदेव सर्वांमध्ये सर्व जगतामध्ये भरून राहिला आहे असे जाणणारा महात्मा अतिशय दुर्मिळ, विरळा (जवळजवळ दुर्लभच) असतो.

_मनुष्याणां सहस्रेषु कश्चिद्यतति सिद्धये।_

_यततामपि सिद्धानां कश्चिन्मां वेत्ति तत्वतः॥७.३॥_

अनेक हजार मनुष्यांमधून कोणीतरी एखादाच सिद्धी मिळविण्यासाठी (आत्मकल्याणासाठी) प्रयत्नशील असतो आणि अशा अनेक हजार सिद्धांपैकी कोणीतरी एकच मला यथार्थपणे जाणून घेऊ शकतो.  

        आपण कणिकाची कपटनीती स्वीकारायची की कृष्णाची राजनीती हे आपणच ठरवायचे आहे. कणिकाच्या उपदेशानुसार कपटनीती हाच जीवनाचा उद्देश तर श्रीकृष्णांच्या उपदेशानुसार राजनीती हा जीवनाचा एक भाग आणि फलाशा न धरता कर्म करत रहाणे, स्वतःच्या आतील विश्वात्मक परमेश्वराचे स्वरूप जाणून घेऊन त्याच्याशी एकरूप होणे हाच जीवनाचा उद्देश.


संकलन व टीप : अभिजीत काळे, ९८५०६९०५९७.


*🌺🌸🌷शुभसकाळ🌷🌸🌺*

No comments:

Post a Comment