Pages

Friday, May 21, 2021

*महाभारतातील निवडक -- राजाची सावधगिरीश्लोक*


       *महाभारतातील निवडक श्लोक*


*नास्यच्छिद्रं परः पश्येच्छिद्रेण परमन्वियात्।*

*गूहेत्कूर्म इवाङ्गानि रक्षेद्विवरमात्मनः।।*

              *- १.१५३.११, महाभारत.*


अर्थ :-


      राजाने इतकी सावधगिरी बाळगायला हवी की, ज्य‍मुळे शत्रू त्याची कमजोरी पाहू शकणार नाही आणि  जर शत्रुची कमजोरी समजून आली तर त्याच्यावर चढाई करावी. ज्याप्रमाणे कासव अपल्या अवयवांचं (शरीराचं) रक्षण करते, त्याचप्रमाणे राजाने आपल्या सर्व अंगांची (म्हणजेच राजा, अमात्‍य, राष्ट्र, दुर्ग, सैन्यबळ, राज्यकोष आणि सुहृद)  रक्षा करायला हवी तसेच आपली दुर्बलता, कमजोर बाबी लपवून ठेवायला हव्यात.


टीप-

महाभारताच्या आदिपर्वातील संभवपर्वामधे पराक्रमी पांडूपुत्रांबद्दल धृतराष्ट्रास असूया वाटते व तो राजा सुबलाचा मंत्री कणिक याला 'पांडवांबरोबर आम्ही कसे वागायला हवे?' असे विचारतो  त्यावेळी कणिक धृतराष्ट्र, दुर्योधन, कर्ण, शकुनी इत्यादिकांना कपटनीतीचा जो उपदेश करतो त्यात वरील श्लोक समाविष्ट आहे.  

      एकच उदाहरण चांगली व वाईट माणसे कशाप्रकारे वापरतात त्यातील भेदही इथे दिसतो. कणिक कासवाचे उदाहरण कपट नीती साठी देतो तर भगवान श्रीकृष्णांनी कासवाचे उदाहरण अर्जुनाला गीतेच्या दुसर्‍या अध्यायात सांख्ययोगामध्ये स्थितप्रज्ञाची लक्षणे सांगताना दिले आहे. ते असे,

_यदा संहरते चायं कूर्मोऽङ्गानीव सर्वशः।_

_इन्द्रियाणीन्द्रियार्थेभ्यस्तस्य प्रज्ञा प्रतिष्ठिता॥_

                    _- २.५८, श्रीमद्भगवद्गीता._

स्थितप्रज्ञाची लक्षणे सांगताना श्रीकृष्णस्वारी म्हणते की जेव्हा ज्ञाननिष्ठेमध्ये स्थित असलेली व्यक्ती कासव ज्याप्रमाणे भयामुळे आपले अंग कवचात खेचून (संकुचित करून) घेते त्याप्रमाणे सर्व विषयोपभोगांपासून आपली इंद्रिये खेचून घेते व इंद्रियनियमन करते, तेव्हा त्या व्यक्तीची प्रज्ञा (बुद्धी) स्थिर होते. (ज्याची बुद्धी स्थिर झालेली म्हणजेच जो इंद्रियोपभोगांपासून परावृत्त झालेला आहे, त्याला भगवान श्रीकृष्ण स्थितप्रज्ञ असे संबोधतात.)

        एकच उदाहरण परस्परविरुद्ध  स्वभावाच्या दोन व्यक्ती कशाप्रकारे लोकांपुढे ठेवतात यातील भेद आपणांस इथे दिसून येतो. भगवांन श्रीकृष्णांनी गीतेतून मनुष्याला आपले दोष, दुर्बलता यांचा त्याग करून सत्य व सद्गतीचा सन्मार्ग दाखवला आहे तर कणिकाने मात्र आपले दोष झाकून कसे ठेवावेत सांगत छल-कपटाचा अधमाधम उपदेश कौरवांना कपटनीतीतून करतो.


संकलन व टीप : अभिजीत काळे, ९८५०६९०५९७.


*🌺🌸🌹शुभसकाळ🌹🌸🌺*

No comments:

Post a Comment